शेतीचा बांध कोरल्यास काय शिक्षा होते..? कायदा काय सांगतो..? वाचा सविस्तर

शेतीचा बांध कोरला तर 5 वर्षांची शिक्षा होणार, अशा आशयाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतीचा बांध.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीच्या बांधावरुन वाद ठरलेला.. हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. अगदी खून करण्यापर्यंतही काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं..
गेल्या काही दिवसांपासून या विषयावरील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे… या पोस्टमध्ये असं म्हटलंय, की ‘ट्रॅक्टरने मशागत करताना नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला गेल्यास ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.. याअंतर्गत 5 वर्षांपर्यंत शिक्षा होते, तसेच ट्रॅक्टर जप्त केला जातो. कायद्यातच तशी तरतूद केलीय..’

ही योजना वाचा :- Maha Bank Farmer Vehicle Loan | दोन / तीन चाकी वाहनांच्या खरेदीसाठी; शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र बँकेची योजना सुरु.
सोशल मीडियावर हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.. या मेसेजमध्ये खरंच तथ्य आहे का, त्यात म्हटल्याप्रमाणे खरंच शिक्षा होते का, कायद्यात त्यासाठी खरंच काही तरतूद केलीय का, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

पहा कायदा काय सांगतो..?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 या कायद्यामध्ये शेतीच्या ‘सीमा व चिन्हे’ असे नववे प्रकरण आहे. त्यात शेतीच्या सीमा निश्चित करणे, त्याबद्दलच्या वादाचे निराकरण करण्याबाबतचा उल्लेख आहे. कोणत्याही शेतीच्या सीमारेषेबाबत वाद निर्माण झाल्यास, संबंधिताना पुरावा सादर करण्याची संधी देऊन जिल्हाधिकारी त्यात दुरुस्ती करू शकतात.
BBC News मराठी नुसार :-
समाज माध्यमांवर बांध कोरल्यास 5 वर्षांची शिक्षा होणार, हे असे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे मग स्थानिक प्रशासनाला यासंबंधी काही आदेश आले आहेत का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महसूल विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

जालना तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप शेनफड याविषयी सांगतात, “बांध कोरल्यास 5 वर्षांची शिक्षा होणार, ती बातमी मीसुद्धा वाचली आहे. पण या बातमीमध्ये काही तथ्य नाहीये. शेतजमिनीचा बांध कोरल्यास ट्रॅक्टर चालक किंवा मालक यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्हाला कोणताही आदेश आलेला नाहीये. त्यामुळे या व्हायरल बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.”
तर परभणी जिल्ह्यातील धसाडी येथील तलाठी बि. एच. बिडगर सांगतात, “बांध कोरल्यास 5 वर्षांची शिक्षा होईल असा तोंडी किंवा लेखी आदेश आलेला नाहीये. असा कुठला कायदाही नाहीये. जी बातमी व्हायरल होत आहे. त्यात काही तथ्य नाही. नवीन कायदा आला असता तर तसा शासन निर्णय निघाला असता.”
यासोबतच राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांशीही आम्ही संपर्क साधला. त्यांनीही बांध कोरल्यास 5 वर्षांची शिक्षा होणार, याबाबत काही आदेश अद्याप प्राप्त न झाल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं.

व्हायरल मेसेज चुकीचा..
बांधाची निशाणी हलवण्याचा प्रयत्न करणे, बांध काढून टाकणे, असा प्रकार केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला 100 रुपये इतका दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात केली आहे.. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात शेतीच्या बांधाचा वाद मिटवण्याची व्यवस्था आहे, पण बांध कोरल्यास 5 वर्षे कारावास किंवा ट्रॅक्टर जप्तीची शिक्षा, असे नमूद केलेले नाही..
शेतीचा बांध सांभाळण्याची जबाबदारी संबंधित जमीनमालकाची आहे.. इतर कोणी बांध कोरल्यास शेतकऱ्याला त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येते.. जिल्हाधिकारी सदर प्रकरणाची चौकशी करतात.. दोन्ही बाजू ऐकून त्याबद्दलचा निर्णय घेऊन शिक्षाही करू शकतात. गरज पडल्यास प्रत्यक्ष जागेवर जाऊन भूमापन करू शकतात.

शेतीचा बांध कोरल्यास ट्रॅक्टर चालकास व मालकास 5 वर्षांची शिक्षा होईल, ट्रॅक्टर जप्त केला जाईल, असा काहीही आदेश आलेला नाही.. या मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही.. तसा कोणताही नवीन कायदा झालेला नाही, तसे असते तर शासन निर्णय निघाला असता, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनीही त्यास दुजोरा दिला.